पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे प्रमुख लेफ्ट. जन. रिझवान अख्तर यांनी काबूलमध्ये अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेऊन दहशतवादविरोधी मोहिमेत परस्परांना करण्यात येणाऱ्या सहकार्यात कशी वाढ करता येईल याबाबत चर्चा केली.
जवळपास एका महिन्याच्या कालावधीत आयएसआय प्रमुखांनी अफगाणिस्तानला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. पेशावरमधील शाळेवर तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला चढविल्यानंतर अख्तर तातडीने काबूलला रवाना झाले होते.
या भेटीबाबत पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी अख्तर यांचे घनी यांनी रविवारी स्वागत केल्याचे अफगाणिस्तानने स्पष्ट केले आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्नांत वाढ कशी करता येईल याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
या वेळी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि प्रांतातील शांतता आणि सुरक्षा याबाबतही उभयतांमध्ये चर्चा झाली. तालिबानचा म्होरक्या मुल्लाह फझलुल्लाह अफगाणिस्तानमध्ये दडून बसला असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. त्याच्याविरुद्ध अफगाणिस्तानने कारवाई करावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे.