संसदीय समितीसमोर धक्कादायक बाब उघड

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी शीख तरुणांना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’कडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्रालयाने संसदीय समितीला दिली आहे. कॅनडा आणि इतरत्र स्थायिक झालेल्या शीख तरुणांमध्ये अपप्रचार करून त्यांना भारताविरोधात चिथावणी देण्यात येत असल्याचेही गृहमंत्रालयाच्या हवाल्याने संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीसमोर ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. समितीने ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि देशांतर्गत सुरक्षेपुढील आव्हाने’ या विषयावरील अहवाल नुकताच संसदेत मांडला.

‘‘शीख तरुणांना पाकिस्तानात ‘आयएसआय’द्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी  बेरोजगार तरूण, गुन्हेगार आणि तस्करांचा वापर करण्यात येत आहे’’, असे या अहवालात म्हटले आहे. पंजाबमध्येच नव्हे तर भारतभर दहशतवादी कारवाया करण्याच्या कटास साह्य करण्यासाठी ‘आयएसआय’चा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या ‘कमांडरां’वर दबाव आहे. युरोप, अमेरिका, कॅनडास्थित शीख तरुणांचीही दिशाभूल करून त्यांना भारताविरोधात चिथावणी देण्यात येत आहे. मात्र, या सर्व परिस्थितीवर केंद्र आणि राज्याच्या यंत्रणांचे बारीक लक्ष आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इंटरनेट, समाजमाध्यमांचा गैरवापर करून तरुणांना कट्टरतेकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे. कायद्याच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी दहशतवादी संघटना सुरक्षित समाजमाध्यमांचा वापर करत असून, त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेपुढे आव्हान निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.