पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था लष्कर ए तोयबा, जैश ए महंमद व हिज्बुल मुजाहिद्दीन, खलिस्तान झिंदाबाद फोर्स, बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेच्या अतिरेक्यांना हाताशी धरून जम्मू-काश्मीर, पंजाब व दिल्ली तसेच देशाच्या इतर भागात हल्ले करण्याचा कट आखला असल्याचे समजते.
आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी अलिकडेच जिहादी अतिरेकी व पंजाबमधील जहाल शीख अतिरेक्यांची एक बैठक घेतली व त्यांना हल्ले करण्यासाठी पैसे दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील १५ ते २० अतिरेकी यात सामील आहेत व पाकिस्तानचेही काही अतिरेकी या हल्ल्यात सामील होणार आहेत. त्यांना सीमेवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. लष्कर ए तोयबा व जमात उद दवाचा प्रमुख हाफिज महंमद सईद याचीही कटात मदत घेतली आहे.
जम्मू-काश्मीरचे अधिकारी, लष्कर व केंद्रीय दले यांनी पंजाबमधील त्यांच्या कार्यालयांना ही माहिती दिली. प्रशिक्षण घेत असलेले काही अतिरेकी हे शीख परंपरा, गुरुमुखी लिपी, करतारपूर गुरुद्वारा (पाकिस्तान) यांच्याशी संबंधित असून त्यात त्यांना खलिस्तान झिंदाबाद फोर्सची मदत आहे. भारतातील पंजाबची स्थानशास्त्रीय माहितीही त्यांना देण्यात आली आहे.