भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यासाठी शीख तरुणांना पाकिस्तानातील आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जात असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी दिली. 
देशातील अंतर्गत सुरक्षाव्यवस्था आणि एनसीटीसीचा सुधारित प्रस्ताव यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील मुख्यमंत्र्यांची बैठक नवी दिल्लीमध्ये बोलावली आहे. या बैठकीमध्ये बोलताना शिंदे यांनी आयएसआयच्या कारवायांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
ते म्हणाले, दहशतवादी कारवायांमध्ये शीख समुदायातील तरुणांना ओढण्याचे मोठे प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानातील आयएसआयकडून या तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यांच्याकडून केवळ पंजाबमध्येच नव्हे; तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखण्यात आलीये. बेरोजगार तरुण, गुन्हेगार, तस्करी करणारे यांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. पाकिस्तानातील काही शिखांकडून चालवण्यात येणाऱया दहशतवादी गटांकडूनही तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
युरोप आणि अमेरिकेमध्ये स्थिरावलेल्या शीख समुदायातील तरुणांना दहशतवादाकडे ओढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.