संघर्षग्रस्त सीरियात अखेर शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी अमेरिका व रशिया यांनी तेथील हल्ले थांबवून त्याची अंमलबजावणी केली. मध्यरात्रीच्या ठोक्याला सुरू झालेल्या शस्त्रसंधीने उत्तरेकडील उद्ध्वस्त झालेल्या अलेप्पो या शहरात शांतता पसरली. त्याआधीच्या दिवशी रशियाने तेथे मोठय़ा प्रमाणात हवाई हल्ले केले होते. देशव्यापी शस्त्रसंधीमध्ये जिहादी गट मात्र सामील नाहीत, तरीही पाच वर्षांनंतर प्रथमच हल्ले थांबले आहेत. तेथील संघर्षांत किमान २ लाख ७० हजार लोक मारले गेले आहेत.
अब्देल रहमान इसा यांनी सांगितले की, युद्ध थांबल्याचा आनंद लपवता येत नाही. जर शांतता राहिली तर आम्ही घरी जाऊ शकू. संयुक्त राष्ट्रांचे दूत स्टॅफन द मिस्तुरा यांनी सांगितले की, शस्त्रसंधीत यश आले तर ७ मार्चला पुन्हा शांतता चर्चा सुरू होईल. विशेष दलाची बैठक जीनिव्हात होत असून त्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल. या दलात १७ देशांचे प्रतिनिधी सहभागी आहेत, आंतरराष्ट्रीय सीरिया पाठिंबा गट असे त्याचे नाव आहे या गटाच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. अमेरिका व रशिया या दलाचे सह अध्यक्ष आहेत. रात्रभर अलेप्पोत शांतता होती, तेथील लोक प्रथमच मुलांना घेऊन बाहेर पडले, आकाशात लढाऊ विमाने घरघरत नव्हती. होम्स व हामा या दोन भागातही शांतता होती. अमेरिका व रशिया यांच्यात शस्त्रसंधी झाली असून त्यात अल कायदाचा अल नुसरा गट व आयसिस यांचा समावेश नाही.