इसिस या दहशतवादी संघटनेचा नेता अबू बक्र अल बगदादी याच्यावर एका मारेकऱ्याकडून विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विषप्रयोगामुळे अल बगदादीची प्रकृती गंभीर असून त्याला सध्या सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, सीरियन सीमेवरच्या निनेवेह जिल्ह्य़ातील अल बाज येथे जेवणातून अल बगदादी आणि इसिसच्या तीन कमांडर्सवर विषप्रयोग झाला. या चौघांवरही विषाचा गंभीर परिणाम झाला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या सर्व प्रकारानंतर इसिसकडून जेवणात विष कालवणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. विषप्रयोग झालेल्या तीन कमांडर्सची ओळख अजूनपर्यंत उघड करण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकारानंतर सर्वांना सुरक्षिततेसाठी अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे.
अबू बक्र अल बगदादीचे नाव यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहे. अनेकदा हवाई हल्ल्यांमध्ये अल बगदादी मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, प्रत्येकवेळी तो सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले होते. हा इराकी जिहादी नेता वयाच्या चाळिशीचा होता व त्याला पकडण्यासाठी अमेरिकने १ कोटी डॉलरचे इनाम लावले होते. इसिसची सूत्रे २०१० मध्ये त्याने घेतली व त्याने अल काईदाच्या स्थानिक शाखेचे रूपांतर आंतरखंडीय दलात केले व स्वत:ला जिहादी समुदायाचा नेता घोषित केले. अबू बकर अल बगदादी याला अमेरिकी व इराकी दलांनी २००४ मध्ये फालुजाह येथे अटक केली पण नंतर सोडून दिले होते. २ मे २०११ रोजी ओसामा बिन लादेन या अल काईदाच्या अतिरेक्याचा अमेरिकी कारवाईत मृत्यू झाल्यानंतर अल बगदादी याने लादेनची स्तुती करून त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती.
त्यानंतर त्याने दक्षिण बगदादमध्ये हल्ला करून २४ पोलिसांना ठार केले. १५ ऑगस्ट २०११ रोजी त्याने आत्मघाती दले तयार करून आयएसआयच्या मदतीने मोसुल येथे ७० जणांचा बळी घेतला. २२ डिसेंबर २०११ रोजी बगदादमध्ये हल्ला करून ६३ जणांना ठार केले. २९ जून २०१४ रोजी त्याने इसिस ही संघटना स्थापन केली त्याचे नाव इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट असे आहे.