इस्लामिक स्टेटने (आयसिस) श्रीलंकेमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी ईस्टर संडेला आठ बॉम्बस्फोटांनी श्रीलंकेला हादरवून सोडले. या बॉम्बस्फोटात ३०० पेक्षा जास्त निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला आहे.५०० पेक्षा जास्त नागरिक या स्फोटांमध्ये जखमी झाले.

श्रीलंकेने आधी स्थानिक इस्लामिक संघटना नॅशनल तौहीद जमातवर संशय व्यक्त केला होता. बॉम्ब स्फोटांमध्ये इसिसच्या खूणा दिसतात असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते. श्रीलंकेमधील नागरी गृहयुद्ध संपल्यानंतर दशकभराने श्रीलंका आठ शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. परदेशी नागरीकांसह आठ भारतीयांचा या स्फोटांमध्ये मृत्यू झाला.

कोलंबोत रविवारी ईस्टरच्या सणावेळी चार आलिशान हॉटेल्स आणि दोन चर्चमध्ये सकाळी ८.४५ वाजता दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. हल्ल्यात एकूण ३२ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून यात ब्रिटन, अमेरिका, टर्की (तुर्कस्तान), भारत, चीन, पोर्तूगीज आणि अन्य दोन देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. श्रीलंका सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सोशल मीडिया आणि मेसेजिंक साईट्सवर निर्बंध आणले होते.

श्रीलंकेत पूर्वी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या कारवायांमुळे दहशतवाद फोफावला होता. तो २००९ मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे यात तमिळ गटांचा हात असण्याची शक्यता नाही. हल्ल्याचे स्वरूप बघता हे आयसिस किंवा त्यांच्या एखाद्या गटाचे कृत्य असावे, असे तपास यंत्रणांचा संशय होता.