अमेरिकेची सीरियात कारवाई
आयसिस या दहशतवादी संघटनेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला ठार मारण्यात अमेरिकेला यश आले आहे. अब्दुल रहमान अल कादुली असे या नेत्याचे नाव आहे. या कारवाईमुळे आयसिसच्या कृत्यांना आळा बसेल, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.
कादुली याला गुरुवारी अमेरिकी सैन्याच्या विशेष पथकाने ठार केल्याचे वृत्त ‘एनबीसी न्यूज’ या वाहिनीने दिले. मात्र, अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी त्यास दुजोरा दिला नव्हता. परंतु शुक्रवारी कार्टर यांनी पत्रकार परिषदेत कादुलीला ठार केल्याचे जाहीर केले. मात्र, त्याला कसे ठार मारण्यात आले याची माहिती देण्यास नकार दिला. परंतु ‘एनबीसी न्यूज’ने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार कादुलीला मारण्यासाठी अमेरिकी सैन्याच्या विशेष पथकाचे हेलिकॉप्टर अज्ञात स्थळी उतरले. परंतु कादुलीने त्यांना हुलकावणी दिली. विशेष पथकाने त्याचा पाठलाग केला. प्रथमत कादुलीला जिवंत पकडण्याचा अमेरिकी सैन्याचा प्रयत्न होता. परंतु कादुलीच्या अंगरक्षकांनी अमेरिकी सैन्याच्या विशेष पथकावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात कादुली ठार झाला. गुरुवारी हा घटनाक्रम घडला. कादुलीच्या मृत्यूची खातरजमा झाल्यानंतरच कार्टर यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला आयसिसचा आणखी एक नेता ओमर शिशानी यालाही ठार मारण्यात अमेरिकेला यश आले आहे. परंतु शिशानीच्या मृत्यूच्या वृत्ताला आयसिसने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

कोण होता कादुली..
* इराकच्या मोसुल शहरात जन्म
* २००४ मध्ये अल-कायदात कार्यरत
* २०१२ मध्ये कादुलीने आयसिसमध्ये प्रवेश
* आयसिसचा सर्वोच्च नेता अबू बक्र अल बगदादी जबर जखमी.
* त्यानंतर आयसिसच्या इराक-सीरियातील कारवायांचे नेतृत्व कादुलीकडे गेले