‘इस्लामिक स्टेट’चा (आयसिस) म्होरक्या अबु बकर अल् बगदादी वायव्य सीरियात अमेरिकेच्या विशेष सुरक्षा दलांनी केलेल्या गुप्त कारवाईदरम्यान एका भुयारात आत्मघाती स्फोटात ठार झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली.

‘इस्लामिक स्टेट’ या निर्दयी संघटनेचा म्होरक्या आणि जगातला पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी कुत्र्यासारखा आणि भित्र्यासारखा मारला गेला, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याची घोषणा करताना व्यक्त केली.

ट्रम्प यांनी रविवारी सकाळी व्हाईट हाऊसमधून दूरचित्रवाणीवर बगदादी ठार झाल्याचे जाहीर केले. ‘‘अमेरिकी सुरक्षा दलांच्या श्वानांनी एका भुयारात दडून बसलेल्या बगदादीला हुडकून त्याचा आणि त्याच्यासोबत असलेल्या तिन्ही मुलांचा पाठलाग केला. त्यामुळे स्फोटकांनी भरलेल्या आत्मघाती जॅकेटचा स्फोट घडवण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता’’, असे ट्रम्प यांनी सांगितले.

कालची रात्र अमेरिका आणि जगासाठी महत्त्वाची होती. अनेकांना त्रास देणारा आणि अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला क्रूरकर्मा मारला गेला आहे. तो आता कधीच निष्पापांना, महिलांना आणि मुलांना त्रास देणार नाही. जग आता अधिक सुरक्षित झाले आहे, असे ट्रम्प म्हणाले.

तीन मुलांसह एका भुयारात दडून बसलेल्या बगदादीचा अमेरिकेच्या सुरक्षा पथकातील श्वानांनी पाठलाग करून त्याला भुयाराच्या दुसऱ्या टोकाकडे पिटाळत नेले. भुयाराचे दुसरे टोक बंद (डेड एंड) असल्याने त्याने अंगावरील स्फोटकांच्या जॅकेटचा स्फोट घडवून आत्महत्या केली. या स्फोटात त्याची तीन मुलेही ठार झाली, असेही ट्रम्प यांनी सांगितले. आत्मघाती स्फोटात बगदादीच्या देहाच्या चिंधडय़ा उडाल्याचेही ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेच्या विशेष कारवाई पथकांनी शनिवारी रात्री धाडसी  कारवाई करून मोहीम फत्ते केली, असे ट्रम्प यांनी सांगितले. उपाध्यक्ष माईक पेन्स आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह आपण ही मोहीमेचे व्हाईट हाऊसमधून थेट प्रक्षेपण पाहत होतो, असे ट्रम्प म्हणाले.

बगदादी आत्मघाती स्फोट घडवण्यापूर्वी रडत आणि किंचाळत होता. तो आजारी होता. त्याला नैराश्यानेही ग्रासले होते. पण आता तो नष्ट झाला आहे. तो हिंसक होता आणि त्याच मार्गाने त्याचा अंत झाला आहे. या कारवाईचे चित्रण लवकरच हाती येईल.  तो नायक नव्हे तर भित्रा होता, असे ट्रम्प म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याला अटक करणे किंवा ठार मारण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य होते, असेही ट्रम्प म्हणाले.

बगदादी कोण होता?

* अबु बकर अल् बगदादी हा कट्टर इस्लामी दहशतवादी आणि स्वयंघोषित खलिफा होता.

* इराकी नागरिक असलेल्या बगदादीने अमेरिकेच्या इराक आक्रमणानंतर अमेरिकी सुरक्षा दलांविरोधात कडवी झुंज दिली होती.

* बगदादी याला यापूर्वी अमेरिकी सैन्य दलांनी अटक करून अबु घरीब आणि बक्का येथील छावणीत ठेवले होते.

’बगदादी इराकमधील ‘अल् काईदा’ या दहशतवादी संघटनेत सामील झाला. नंतर त्याने ‘इस्लामिक स्टेट’ची स्थापना केली.

* बगदादी २०१० मध्ये आयसिसचा नेता होता आणि २०१३ मध्ये आयसिसचा प्रमुख झाला.

* अमेरिकेने त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे इनाम लावले होते.

बगदादी ठार झाला असून, ‘आयसिस’सह अन्य दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे.

– डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका