क्रूरकृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या आयायिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. सीरियातील रक्काजवळ रशियन सैन्याच्या हवाई हल्ल्यात त्याचा खात्मा झाल्याचे वृत्त असून आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती घेत आहोत असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

रशियाच्या सुरक्षा दलांना सीरियातील रक्काजवळ मे महिन्याच्या शेवटी आयसिसच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली होती. ‘२८ मेरोजी ड्रोनद्वारे आम्ही बैठकीचे स्थान आणि वेळ याची माहिती मिळवली होती. स्थानिक वेळेनुसार रात्री १२.३० ते १२.४५ दरम्यान रशियन सैन्याने आयसिसचे नेते ज्या ठिकाणी जमले त्याठिकाणी हवाई हल्ले केले’ असे रशियन सैन्याने म्हटले आहे.

हवाई हल्ल्यात आयसिसचे प्रमुख नेते, ३० हून अधिक फिल्ड कमांडर आणि ३०० दहशतवादी ठार मारले गेले असे रशियाने म्हटले आहे. रक्का शहरातील दक्षिण भागात आयसिसच्या नेत्यांची बैठक होणार होती. या बैठकीत आयसिसच्या पुढील वाटचालीविषयी चर्चा होणार होती असे सूत्रांनी सांगितले.

हवाई हल्ल्यांविषयी अमेरिकेला पूर्वकल्पना होती असे रशियाने स्पष्ट केले. सीरियातील मोसूल आणि रक्का या दोन शहरांमध्ये सीरिया आणि रशियाच्या सैन्याने आयसिसला जोरदार दणका दिला असून या शहरांमध्ये आयसिसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीरियात रशिया सैन्याने सीरियन सैन्याला पाठिंबा दिला आहे. तर इराकमध्ये अमेरिकेने इराकी सैन्याला पाठिंबा दिला आहे.

बगदादीचा शेवटचा व्हिडीओ २०१४ मध्ये प्रसारित झाला होता. यापूर्वीही अनेकदा बगदादीचा खात्मा झाल्याचे वृत्त आले होते. पण सीरियातील आयसिसचे सद्य स्थिती पाहता रशियाच्या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.