पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अत्यंत संवेदनक्षम नागरी आणि लष्करी तळांवर आयसिसकडून हल्ला होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
गुप्तचर यंत्रणांचा हवाला देऊन हा इशारा देण्यात आला असून पंजाबच्या गृहमंत्रालयाने पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नागरी आणि लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याची आयसिसने योजना आखली असल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.
या इशाऱ्यामुळे विभागीय पोलीस प्रमुख आणि दहशतवाद प्रतिबंधक विभाग यांनी सुरक्षेच्या कडेकोट उपाययोजना आखण्यास सांगण्यात आले असल्याचे ‘डॉन’ने सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे.
पोलीस गस्ती पथके, लष्करी वाहने आणि खासगी आस्थापना हे आयसिसच्या दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे.
पाकिस्तानातील मध्यवर्ती सरकारने देशात आयसिसचे अस्तित्व नसल्याचा दावा केला असला तरी गुप्तचर यंत्रणांचा इशारा त्याविरोधातील आहे.