इतके दिवस सीरिया व इराकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इसिसने अलीकडे काश्मीरमध्ये झेंडे फडकावले होते. त्यांनी आता भारतावर हल्ला करून त्याला अमेरिकेविरूद्ध संघर्ष करण्यास भाग पाडण्याचे ठरवले आहे. इसिसच्या अंतर्गत अतिरेकी भरती कागदपत्रांवरून पाकिस्तान व अफगाणिस्तानला एकत्र आणून दहशतवाद्यांची एकजूट करण्याचा त्यांचा इरादा आहे. इसिसने भारतावर हल्ला करण्याची तयारी केली असून त्यामुळे संतप्त भावना निर्माण होऊन अमेरिकेशीही संघर्ष निर्माण होईल असा त्यांचा हेतू आहे.
‘यूएसए टुडे’ या नियतकालिकात एक शोधवृत्त प्रसिद्ध झाले असून त्यात अमेरिका मीडिया इन्स्टिटय़ूट या संस्थेने पाकिस्तानी नागरिकांकडून मिळालेल्या ३२ पानी कागदपत्रांच्या आधारे माहिती दिली आहे. त्यात इसिसचे पाकिस्तानच्या तालिबानशी कसे संबंध आहेत हे दिसून आले आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर अमेरिका बिथरेल व नंतर मित्र देशांसह हल्ला करील व त्यामुळे उमाह म्हणजे मुस्लीम लोक अंतिम युद्धासाठी एकत्र येतील. या कागदपत्रांचे हार्वर्डच्या विद्वानाने इंग्रजीत भाषांतर केले असून त्यांची शहानिशा विद्यमान व निवृत्त गुप्तचर अधिकारी करीत आहेत. सीआयएचे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी सांगितले की, इसिसने भारतावर हल्ला केला, तर इसिसचे स्थान उंचावेल व त्यामुळे त्या भागातील स्थिरता धोक्यात येईल. भारतावर हल्ला करणे हा दक्षिण आशियातील जिहादींचा मूळ उद्देश आहे. या कागदपत्रांवर तारखा नाहीत पण त्याचे नाव ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ द इस्लामिक स्टेट खिलाफत’ असे आहे. त्यात असे म्हटले आहे की, पाकिस्तानी व अफगाणी तालिबान्यांना एक करून मोठे दहशतवादी सैन्य तयार करावे, त्यामुळे इतिहासाने पाहिले नाही असे इस्लामी राज्य तयार होईल. पुढची युद्धे शरीर गोठवून टाकणारी असतील असे अल काईदाचे मत आहे. इस्लामी स्टेटचा नेता सांगतो की, त्यांना जगातील १ अब्ज मुस्लिमांवर राज्य करायचे आहे. त्याला खिलाफत असे नाव आहे.अफगाणिस्तानात इसिसचे अस्तित्त्व आहे व व्हाईट हाऊस त्यावर लक्ष ठेवून आहे. इसिसच्या धोक्यावर गेल्या दोन महिन्यात पाकिस्तान व अमेरिका यांच्यात गेल्या दोन महिन्यात चर्चा झाली आहे.