भारतीय कुटुंबव्यवस्थेची मुळे बळकट असल्यामुळेच ती ‘आयसिस’सारख्या दहशतवादी संघटनेच्या कट्टर विचारसरणीला प्रतिबंध करू शकली, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
येथे आयोजित केलेल्या एका परिषदेत राजनाथसिंह बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज जगभरात ‘आयसिस’बद्दल बोलले जात आहे. पण, भारत हा एकमेव देश असा आहे की, जिथे आयसिस आपले बस्तान बसवू शकलेली नाही. मुंबईतील एक मुस्लिम युवक कट्टरतावादी विचारांच्या प्रभावाखाली आला. त्याला त्यापासून वाचविण्याची विनंती त्याच्या कुटुंबीयांनी मला केली. आपल्या देशाची मूल्यसंस्कृती अशी असल्यामुळेच आयसिसला भारतात थारा मिळणार नसल्याचा विश्वास वाटतो. ही संस्कृती टिकविणे आपली जबाबदारी आहे. जर आपण ती टिकविली, तर भारताला महासत्ता बनण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. भारतात इस्लामचे ७२ पंथ गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इतर कुठल्याही इस्लामी देशात हे घडत नाही. मायदेशातून निर्वासित झालेल्या पारशांना भारतात सर्वाधिक आदर मिळाला. हे या देशाच्या शिक्षण आणि संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. परंतु, दहशतवाद आणि कट्टरतेचे प्रश्न केवळ शिक्षण सोडवू शकणार नसल्याचेही राजनाथ यावेळी म्हणाले. मुळांशी बांधीलकी राहील अशी शिक्षणपद्धतीचे हवी असेही ते म्हणाले.