‘इस्लामिक स्टेट ग्रुप’ म्हणजे इसिसने त्यांच्या प्रचारार्थ जारी केलेल्या वृत्तपटात  मोसूल ताब्यात घेतल्याच्या घटनेचे चित्रण दाखवले आहे. इराकमधील मोसूल हे दुसरे मोठे शहर असून ते इसिसने सहज ताब्यात घेतले. या वृत्तपटात इसिसचे उदात्तीकरण करण्यात आले असून मोसूलमधील विजय व तेथे तीन आठवडय़ात खिलाफत सुरू करण्याच्या तसेच इराकी सैन्याच्या पाडावाचे चित्रण त्यात आहे.
२९ मिनिटांच्या या वृत्तपटाचे प्रसारण या आधी करण्यात आले नव्हते. मोसूलमधील आगेकूच अपेक्षेपेक्षा सहज झाली असे वर्णन या वृत्तपटात केले असून तो समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) टाकण्यात आला आहे. वाहनांचे तीन काफिले शहरात येताना त्यात दिसतात व त्या वेळी इसिसचे जवान मोठय़ा प्रमाणात होते. ९ जूनला मोसूलमध्ये जिहादी हल्ला सुरू झाला व त्यानंतर २० लाखांचे हे शहर इसिसने दुसऱ्याच दिवशी ताब्यात घेतले होते. त्यावेळी अनेक इराकी लोक शेजारच्या कुर्दीस्तानमध्ये पळून गेले. इराकी सुरक्षा दलांच्या सैन्याची कामगिरी निराशाजनक झाली. अमेरिकेने इराकच्या सैन्याला अब्जावधी डॉलर्स खर्च करून दिलेले प्रशिक्षण अशा रितीने वाया गेले होते. इसिसने नंतर बगदादमध्ये काळा झेंडा फडकावला. जिहादींना थांबवण्यासाठी अमेरिका व इराणने केलेले प्रयत्न फोल ठरले. अमेरिकेने इसिसवर ४५०० हवाई हल्ले केले पण त्यांनी या हल्ल्यांना तोंड देत लढाई चालू ठेवली. मोसूल येथे त्यांनी शस्त्रागारही लुटले होते.

लैंगिक आरोपातून कान्ह यांची अखेर निर्दोष मुक्तता
लिली (फ्रान्स) – न्यूयॉर्कमधील एका हॉटेलातील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्यामुळे वादात सापडलेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अध्यक्ष डॉमिनिक स्ट्राऊस-कान्ह यांना येथील न्यायालयाने दलालीच्या आरोपातून दोषमुक्त केले आहे. फ्रान्समधील उच्चभ्रू वर्गात होणाऱ्या समारंभात वेश्या पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
एके काळी फ्रान्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेले स्ट्राऊस-कान्ह २०११ मध्ये न्यूयॉर्कमधील एका महिला कर्मचाऱ्याशी केलेल्या असभ्य वर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागले. संबंधित महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप कान्ह यांच्यावर लावण्यात आला होता. मात्र, २०१२ मध्ये हा आरोप काढून टाकण्यात आला. उत्तर फ्रान्समधील काही निवडक शहरांत झडणाऱ्या उच्चभ्रू वर्गाच्या पाटर्य़ामध्ये नियमितपणे वेश्या पुरवल्या जायच्या. या पाटर्य़ाना पॅरिस, ब्रुसेल्स आणि वॉशिंग्टन येथून महिला यायच्या. या पाटर्य़ाच्या आयोजनात कान्ह यांचा समावेश असायचा. त्यामुळे त्यांच्यावर वेश्या पुरवल्याचा आरोप होता. मात्र, त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्याइतपत  पुरेसे पुरावे मिळू शकले नाहीत. या पाश्र्वभूमीवर कान्ह यांना दोषमुक्त करण्यात आले. लिली या शहरातील न्यायालयात कान्ह यांच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू होती. फेब्रुवारी महिन्यात बचाव पक्षाने कान्ह यांची बाजू मांडताना त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळू शकले नसल्याचे स्पष्ट केले होते.

डोवल पुढील आठवडय़ात म्यानमारच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे १७ जून रोजी म्यानमारला जाणार असून तेथे ते अध्यक्ष यू थेन सेन यांच्यासह उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेणार आहेत. भारतीय सैन्याने म्यानमारची सीमा ओलांडून घुसखोरांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा हा दौरा होत आहे.
दोन्ही देशांची सरकारे ‘सतत संपर्कात’ असून ईशान्य भारतातील घुसखोरांविरुद्ध ‘यापुढील संयुक्त कारवाई’ करण्याबद्दल चर्चा करण्यासाठी डोवल म्यानमारचा दौरा करणार असल्याचे सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.