दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या आयसिसच्या दहशतवाद्याला गुप्तचर यंत्रणांनी सापळा रचून अटक केली. या दहशतवाद्याला गुप्तचर यंत्रणांनीच शस्त्रास्त्रे पुरवली. इतकेच नव्हे तर त्याच्या दिल्लीतील मुक्कामाची सोय देखील गुप्तचर यंत्रणेनेच केली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये ही कारवाई करण्यात आली असून गुप्तचर यंत्रणांनी अशा स्वरुपाचा सापळा रचून एखाद्या दहशतवाद्याला अटक केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तान, दुबई आणि नवी दिल्ली या ठिकाणी गुप्तचर यंत्रणा जवळपास १८ महिने दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून होत्या. आयसिसच्या १२ दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले असून ते विविध ठिकाणी हल्ले करतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. ‘रॉ’कडून दुबईतून अफगाणिस्तानमधील एका खात्यात ट्रान्सफर झालेल्या ५० हजार डॉलरचा तपास सुरु होता. याच दरम्यान अमेरिकेकडून मिळालेल्या माहितीवरुन आयसिसच्या रडारवर दिल्ली आहे, हे स्पष्ट झाले. त्याच वेळी ‘रॉ’ने अ हा कट उधळून लावण्यासाठी थेट आयसिसच्या दहशतवाद्यालाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.  यातील एक दहशतवादी हा अफगाणिस्तानमधील २० वर्षांचा तरुण असून त्याचे वडील अफगाणिस्तानमधील मोठे व्यावसायिक आहेत, अशी माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.

दहशतवाद्याने आधी दिल्लीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला तो महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहत होता. यानंतर त्याने लाजपतनगरमध्ये भाड्याने घर घेतले. यानंतर त्याने हल्ल्याची तयारी सुरु केली.
दहशतवाद्यावर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणेतील ८० जणांची टीम कार्यरत होती. दहशतवाद्याला घर मिळवून देण्यापासून ते शस्त्रास्त्र पुरवण्यापर्यंतचे काम गुप्तचर यंत्रणेकडूनच केले जात होते. यासाठी गुप्तचर यंत्रणेतील एका एजंटने त्या दहशतवाद्याशी ओळख वाढवली होती. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवाद्यासाठी रचलेला हा सापळा होता.

अफगाणिस्तानमधील म्होरक्यांकडून त्या दहशतवाद्याला सुचना येत होत्या. दहशतवादी जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट होताच गुप्तचर यंत्रणांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीसाठी अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेचे एक पथकही भारतात आले होते. या दहशतवाद्याची रवानगी अफगाणिस्तानमधील तुरुंगात करण्यात आली असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच अमेरिकेच्या सुरक्षा दलाना तालिबानी नेत्यांना ठार मारता आले.