इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता आणि संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा नेता अबु मोहम्मद अल अदनानी सीरियातील अलेप्पो भागातील कारवाईवेळी मारला गेल्याचे आयसिसनेच म्हटले आहे. अलेप्पो प्रांतात मंगळवारी अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त लष्कराकडून हवाई हल्ले करण्यात आले. त्यामध्ये अदनानी मारला गेल्याचे आयसिसने म्हटले आहे. अदनानी याला ठार करण्यासाठीच अमेरिकेने अलेप्पोमध्ये हवाई हल्ले केल्याचे अमेरिकेच्या लष्करी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अदनानी याला ठार करण्यासाठी सीरियामध्ये संयुक्तपणे कारवाई करण्यात आली होती. अलेप्पो, अल-बाबमध्ये हवाई हल्ले करण्यात आले, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात अदनानी ठार झाल्याबद्दल अधिकृतपणे आमच्याकडे माहिती नाही. आम्ही घटनास्थळी परिस्थितीची पाहणी करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आयसिसच्या अमाकने म्हटले आहे की, अबु मोहम्मद अल अदनानी हा अलेप्पोतील कारवाईवेळी मारला गेला. अलेप्पोतील हल्ले परतावून लावण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. पण अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये तो ठार झाला. अदनानी हा आयसिसच्या प्रमुख म्होरक्यांपैकी एक होता. त्याच्या मृत्यूमुळे संघटनेला मोठा धक्का बसला आहे. अदनानीने जिहादी संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. तू मूळचा पश्चिम सीरियातील इडलिबमधील होता. गेल्या काही वर्षांपासून तो संघटनेत प्रवक्ता म्हणून कार्यरत होता.