कोइम्बतूर : तमिळनाडूच्या कोइम्बतूर शहरातील मंदिरे व चर्चेसवर दहशतवादी हल्ले करण्याचा कथितरीत्या कट रचणाऱ्या आयसिसच्या ३ संशयित समर्थकांची स्थानिक न्यायालयाने गुरुवारी ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) चौकशीसाठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची ८ दिवसांची कोठडी मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी प्रधान जिल्हा न्यायालयात केला होता. त्यानुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश आर. शक्तिवेल यांनी गुरुवारी पोलिसांना या तिघांना कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली.

या तिघांविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, त्यांनी मंदिरे, चर्चेस तसेच जेथे लोक मोठय़ा संख्येने एकत्र येतात अशा ठिकाणांवर आत्मघातकी हल्ले करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी या तिघांवर पाळत ठेवली होती. हे तिघे आयसिसचे व्हिडीओ पाहात असताना आढळल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या तिघांच्या  घरांत डिजिटल उपकरणे व कागदपत्रे आढळल्यानंतर १५ जूनला त्यांना अटक करण्यात आली होती.

श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यांचा सूत्रधार झहरान हशीम याचा फेसबुकवरील मित्र असलेल्या मोहम्मद अझरुद्दीन याला अटक झाल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली होती.