सौदी अरेबियाच्या पूर्व भागात शिया समुदायाच्या मेळाव्यावर शुक्रवारी एका बंदूकधाऱ्याने गोळीबार करून पाच जणांना ठार केले. इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांशी संबंधित गटाच्या या हल्लेखोराला नंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे अंतर्गत मंत्रालयाने सांगितले.
सौदी अरेबियातील सुन्नी दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्यांनी केलेले बाँबस्फोट आणि गोळीबाराच्या मालिकांमधील ही सगळ्यात ताजी घटना आहे. सुन्नी पंथीयांचे वर्चस्व असलेल्या सौदी अरेबियात अल्पसंख्याक असलेल्या शिया पंथीयांच्या अत्यंत पवित्र सणांपैकी एक असलेल्या ‘अशुरा’चा स्मरणोत्सव सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांनी पूर्व प्रांतातील कातिफ भागात हे खून पडले आहेत. या गोळीबारात एका महिलेसह पाच नागरिक जखमी झाले, तर इतर ९ जण जखमी झाले, असे अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास स्वयंचलित शस्त्र घेऊन आलेल्या एका संशयिताने शिया पंथीयांच्या सभागृहात अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रत्युत्तरात गोळीबार करून या संशयिताला ठार मारले.