आयसिस या दहशतवादी संघटनेच्या काश्मीरमधील म्होरक्यासह चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी शुक्रवारी कंठस्नान घातले असून या दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेदरम्यान हल्ला करण्याचा कट होता, असा संशय सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.

आयसिसची जम्मू- काश्मीरमधील संघटना ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर’चा (आयएसजेके) म्होरक्या दाऊद अहमद सल्फी चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी शुक्रवारी कंठस्नान घातले. अमरनाथ यात्रा ज्या मार्गावरुन जाते त्या मार्गाजवळ असलेल्या खिरम या गावात झालेल्या चकमकीत या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. याची सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करण्याचा कट होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद म्हणाले, आयसिसच्या जम्मूतील संघटनेचे जाळे आता उद्ध्वस्त झाले आहे. या संघटनेचे आता फक्त दोनच दहशतवादी शिल्लक असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट होता का, याबाबत त्यांनी भाष्य केलेले नाही.

गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसिस आणि इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर या संघटनेचा थेट संबंध नव्हता. आयसिसकडून जम्मू-काश्मीरमधील संघटनेला शस्त्रास्त्र, पैसे किंवा अन्य कोणत्याही स्वरुपातून पुरवठा होत नव्हता. आयसिस या संघटनेला आता जगभरात ओळखले जाते. याचा फायदा घेऊन जम्मू- काश्मीरमधील तरुणांनी दहशतवादाकडे आकर्षित व्हावे यासाठी या दहशतवाद्यांनी आयसिसला समर्थन देत आयएसजेके ही संघटना सुरु केली होती, असे समजते.

दरम्यान, केंद्रीय गृहखाते आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी राज्यात आयसिसचे दहशतवादी नाहीत, असा दावा केला होता. मात्र, आता आयसिस समर्थक दहशतवादी चकमकीत मारले जात असल्याने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.