News Flash

इस्लाम धर्मात दहशतवादाला थारा नाही – अश्रफ घनी

बलुचिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती असून हा हिंसाचार थांबवण्याची गरज आहे असेही ते म्हणालेत.

इस्लाम धर्मात दहशतवादाला थारा नाही. इस्लामच्या नावाखाली दहशतवाद पसरवणे अयोग्य असून आपण सर्वांनीच दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहन अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी केले आहे. बलुचिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती असून हा हिंसाचार थांबवण्याची गरज आहे असेही ते म्हणालेत.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी भारत दौ-यावर असून त्यांनी दिल्लीतील संरक्षण धोरणावर आधारित एका चर्चासत्रात सहभाग घेतला. यात त्यांनी दहशतवादाविषयीचे धोके सांगतानाच पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. बलुचिस्तानमध्ये हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचाराच्या बातम्या येत नाही. पण तो थांबवण्याची गरज आहे असे ते म्हणालेत. स्वतंत्र बलुचिस्तानला तुमचा पाठिंबा आहे का असा सवाल विचारला असता घनी यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. आम्ही बलुचिस्तानमध्ये अशांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत नाही असे त्यांनी सांगितले. दहशतवादी संघटनांचे ध्येय एकच असले तरी त्यांच्या कार्यपद्धती झपाट्याने बदलत आहेत. देशांनी दहशतवादासाठी बाह्य शक्तींकडे बोट दाखवू नये. तसेच दहशतवादाचे चांगला आणि वाईट दहशतवाद असे विभाजनही करु नये असे घनी यांनी सांगितले. दहशतवाद हा एका विषारी सापासारखा आहे. दहशतवाद हा एक दोन वर्षांसाठी राहणार नाही. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन प्रदीर्घ लढा देण्याची गरज आहे असेही घना यांनी नमूद केले.

अफगाणिस्तानला चारही बाजू बंदिस्त आहेत. पाकिस्तानला सागरी किनारा लाभला. पण त्यांची मानसिकता बंदिस्त आहे असा चिमटाही त्यांनी पाकला काढला. पाकिस्तान अफगाणिस्तान आणि भारत या दोन देशांमधील व्यापार बंद करत असेल तर त्यांची चिंता करण्याची गरज नाही. चाबहार बंदरचा विकास झाल्यावर हा प्रश्वही मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, अश्रफ घनी यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांवर दहशतवादाच्याच मुद्द्यावर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.

अफगाणिस्तानच्या विकासात नेहमीच साथ देऊ अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली. शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, महिला सबलीकरण, उर्जा, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात अफगाणिस्तानला मदत करु असे मोदींनी घनी यांना सांगितले. अफगाणिस्तानला भारताकडून जागतिक दर्जाची आणि स्वस्त दरातल्या औषध दिली जातील अशी घोषणाही मोदींनी केली. भारत, इराण आणि अफगाणिस्तान या तीन देशांनी एकत्र येऊन केलेल्या करारांना मिळालेल्या यशावर दोघांनी समाधान व्यक्त केले. तसेच या महिन्यात भारत – अमेरिका आणि अफगाणिस्तान या तिन देशांमध्ये होणा-या करारांवरही दोन्ही नेत्यांध्ये चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 7:57 pm

Web Title: islam doesnt allow terrorism says ashraf ghani
Next Stories
1 न्यायधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोणताही खोळंबा नाही- केंद्र सरकार
2 रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण देशातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत २५ व्या स्थानी
3 बिहार सरकार शहाबुद्दीनच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
Just Now!
X