‘आय मॉनेटरी अॅडव्हायझरी’ या नावाने इस्लामिक बँक चालवणाऱ्या एकाने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. महम्मद मन्सूर खान असे या इसमाचे नाव असून त्याने अनेकांना मोठे रिटर्न्स मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत गंडा घातला आहे. तसेच आता तो फरार झाल्याची माहितीही समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, त्याने मुस्लिम समुदायातील लोकांना लक्ष्य करत तब्बल 1 हजार 500 कोटी रूपये जमवले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मन्सूरने त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पळ ठोकला होता. तसेच सध्या बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

मन्सूर विरोधात सध्या 23 हजार तक्रारी दाखल असून पहिली तक्रार त्याचा जवळचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार खालिद अहमद याने दाखल केली होती. त्याने मन्सूरवर 4.8 कोटी रूपयांच्या फसवणुकीचा आरोप केला होता. त्याच्या 24 तासानंतर मन्सूरची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यामध्ये त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. या ऑडिओ क्लिपनंतर अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु त्यापूर्वीच मन्सूर फरार झाला होता.

8 जून रोजी संध्याकाळी 6.45 पर्यंत त्याचे इमिग्रेशन पूर्ण झाले आणि त्यानंतर तो दुबईला गेला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. यापूर्वी बुधवारी त्याच्या कंपनीच्या सात संचालकांनाही अटक करण्यात आली होती. तसेच मन्सूरची गाडीही जप्त करण्यात आली होती. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक गुंतवणुकदारांनी त्याच्या कंपनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.