ईशान्य नायजेरियात इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २९ विद्यार्थी आणि एका शिक्षकाची हत्या करण्यात आली. एका निवासी शाळेवर हा हल्ला करण्यात आला.
हा हल्ला इतका भीषण होता की काही विद्यार्थ्यांना जिवंत जाळण्यात आले. योब प्रांतातील मोमुडो शहरातील सरकारी माध्यमिक शाळेत ही घटना घडली. मलम अब्दुलाही या शेतकऱ्याची दोन मुले या हल्ल्यात मारली गेली. आता उर्वरित तीन मुलांना शेजारच्या शाळेतून काढणार असल्याचे त्याने सांगितले. सरकारने मेच्या मध्यात ईशान्येकडील तीन प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केल्यानंतर या भागात मोठय़ा प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार आहे. मूलतत्त्ववाद्यांनी गेल्या तीन वर्षांत अनेक शाळांना आगी लावल्या असून १६०० जणांना ठार केले आहे.