सिरीयातील पामायरा शहरात प्रसिद्ध विजय कमान इस्लामी स्टेटच्या अतिरेक्यांनी उडवून दिली, असे पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखांनी सांगितले. पामायरा येथील पुरातत्त्व स्थळे नष्ट करण्याचा इसिसने चंगच बांधला आहे. अतिरेक्यांनी सीरिया व इराकमध्ये अशी अनेक ठिकाणे पाडली आहेत. ऑगस्टमध्ये एका पुरातत्त्व वस्तूसंग्रहालय प्रमुखाची हत्या केली होती. सीरियातील पुरातत्त्व वस्तू संग्रहालय संचालक मामुन अब्दुल करीम यांनी युनेस्कोच्या यादीतील वारसा ठिकाणांची जिहादी अतिरेकी नासधूस करतील, असा इशारा मे महिन्यात दिला होता. शहराची पूर्ण नासधूस झाली असून त्यांना कोलोनेड हे अॅम्फी थिएटरही पाडायचे आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने आता पामायराला यापासून वाचवावे. वाळवंटातील मोती या नावाने पामायरा शहर प्रसिद्ध आहे.