इराकची राजधानी बगदादच्या दक्षिणेला एका फुटबॉल स्टेडियममध्ये आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात २९ ठार तर ६० जण जखमी झाले आहेत, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करी सूत्रांनी सांगितले, की आम्ही आयसिसकडून आणखी एक भाग हिसकावला आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. बगदादपासून ३० मैल अंतरावर इस्कादेरिया येथे छोटय़ाशा स्टेडियमवर हा स्फोट करण्यात आला. अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून तसे निवेदन ऑनलाइनवर टाकले आहे. साइट या गुप्तचर गटाने सांगितले, की आयसिस इराकी दलांना घाबरवण्यासाठी आत्मघाती हल्ले करीत आहे. इराकचे लष्करी प्रवक्ते याह्य़ा रसोल यांनी सांगितले, की इराकी सैन्य व सुन्नी आदिवासी यांनी पश्चिम अनबारमधील कुबेसा हे शहर आयसिसकडून हिसकावले आहे. आयसिसने एक दिवस आधी उत्तर निनेवेह प्रांतातून हवाई हल्ल्यांमुळे माघार घेतली होती. इराकी सैन्यदलांनी अनबारमधील आघाडीचा फायदा घेत मोसुलमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या मते आयसिसने इराकमध्ये बळकावलेला चाळीसटक्के भूभाग गमावला आहे तर सीरियात २० टक्के भूभाग गमावला आहे. या पराभवामुळे आयसिस आणखी चवताळून हल्ले करण्याची शक्यता आहे. मंगळवारी ब्रसेल्स येथे केलेल्या हल्ल्यात ३४ जण ठार तर ३०० जखमी झाले होते, त्या हल्ल्याची जबाबदारीही आयसिसने घेतली आहे.