सध्याच्या काळात ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनांचे आव्हान परतवून लावण्यासाठी धर्माला दहशतवादापासून दूर ठेवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्यावेळी मोदींनी जॉर्डनचे सम्राट किंग अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना आजघडीला जगासमोरील मोठे आव्हान असल्याच्या मुद्द्यावर यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये एकमत झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. त्यासाठी दहशतवाद आणि धर्म यांच्यातील संबंध संपुष्टात आणला पाहिजे, असे मोदींनी सांगितले. तसेच ‘इसिस’सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रोखायचे असेल तर जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. त्यासाठी जागतिक दहशतवादाच्या उच्चाटनासाठी प्रलंबित असलेल्या करारांवर लवकरात लवकर एकमत होण्याचीही गरज आहे. जगातील एकसष्ठांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताचा सुरक्षा परिषदेत समावेश नसण्याचे कारण न पटण्यासारखे आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार झाला पाहिजे आणि आजच्या जगाच्या वास्तवाला सामोरे जाण्याइतपत तिचे कालसंगत स्वरूप असले पाहिजे, असे आग्रही प्रतिप्रादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत केले होते.