आफ्रीकेमधील मोझँम्बिक या देशामध्ये इस्लामिक स्टेटच्या (आयसीस) दहशतवाद्यांनी एका गावातील ५० जणांचा शिरच्छेद केला आहे. कैबो डेलगाडो राज्यातील नांजबा गांवामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आयसीसच्या दहशतवाद्यांनी एका फुटबॉलच्या मैदानामध्ये ५० जणांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करुन जंगलामध्ये फेकून दिल्याची माहितीही समोर आली आहे. या गावातील महिलांचे अपहरण करुन त्यांना देहविक्रीसाठी (सेक्स सेव्ह) ताब्यात घेण्यात आलं आहे.

बीबीसी आणि डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार गावातील महिलांचे अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांनी संपूर्ण गावालाच आग लावली. गावातील अनेक घरं जळून खाक झाली आहेत. घोषणा देतच दहशतवाद्यांच्या टोळीने गावामध्ये प्रवेश केला आणि ते घरांना आगी लावू लागले. या दहशतवाद्यांना विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची हत्या करण्यात आली.

या गावामध्ये झालेल्या या घटनेत बळी पडलेले अनेकजण हे गावातील तरुण तरुणी आहेत. या लोकांनी दहशतवाद्यांना साथ देण्यास आणि त्यांच्या संघटनेत सहभागी होण्यास नकार दिल्यानेही त्यांची हत्या करण्यात आली. आधी या दहशतवाद्यांनी या गावकऱ्यांचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर मृतदेहांचे तुकडे करुन काही जंगलात फेकले तर काही नातेवाईकांना दफनविधीसाठी पाठवून दिले.

कैबो डेलगाडो राज्य हे येथील नैसर्गिक वायूंच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. सन २०१७ पासून आतापर्यंत या राज्यामध्ये इस्लमिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी दोन हजारहून अधिक जणांची हत्या केली आहे. या दहशतवाद्यांच्या भीतीमुळे चार लाख ३० हजारहून अधिक स्थानिकांनी राज्य सोडून दुसरीकडे पलायन केलं आहे.

यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळीही ५० जणांचा शिरच्छेद करण्यात आला होता. या सर्व घटना एक्सॉन मोबील आणि टोटल गॅस प्रकल्पांजवळ घडल्या आहेत. या प्रदेशामध्ये मागील काही काळापासून हे विकास प्रकल्प आल्यानंतर येथील दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.