इसिसने जपानच्या दुसऱ्या ओलिसाचाही शिरच्छेद केला असून तसा दावा एका दृश्यफितीत करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या नृशंस हत्येचा निषेध करण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी या घटनेचा क्रूर कृत्य म्हणून निषेध केला आहे.
जपानचे मुक्त पत्रकार केन्जी गोटो यांना इसिसने ओलिस ठेवले होते व जॉर्डनमधील अतिरेकी महिलेला सोडले नाही तर त्याची हत्या करण्याचा इशारा दिला होता. जॉर्डनच्या एका वैमानिकालाही ओलिस ठेवले असून त्याचे काय केले याबाबत दृश्यफितीत काही उल्लेख नाही, त्यालाही ठार मारण्याची धमकी इसिसने दिली होती. गोटो हे प्रतिष्ठित पत्रकार होते. त्यांना ग्वाटानामो बे येथे कैद्यांना जसे नारिंगी पोशाख घालतात तसा घातला होता. एका माणसापुढे ते गुडघे टेकून उभे आहेत व या हत्येला जपान सरकार जबाबदार आहे असे तो म्हणतो.
 पूर्ण शरीर झाकलेली व्यक्ती म्हणजे इसिसचा अतिरेकी असून त्याने जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांना असा इशारा दिला आहे की, जपान सरकारने बेदरकार निर्णय घेतले त्याचे परिणाम आता भोगा. जपानसाठी दु:स्वप्नांची मालिकाच आता सुरू होत आहे. नंतर या व्हिडिओत गोटोचे डोके छाटलेले दिसत आहे. अ‍ॅबे यांनी सांगितले की, आम्ही अतिरेक्यांना माफ करणार नाही. रविवारी सकाळी इसिसची दृश्यफीत जपानमध्ये दाखवण्यात आली. गोटोच्या आई जुन्को इशिडो यांनी सांगितले की, या दु:खाचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. गोटोचे भाऊ जुनीची गोटो यांनी सांगितले की, आपल्याला आशा होती पण आता ती संपली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. जपान व अमेरिका अजूनही शिरच्छेदाच्या घटनेची खातरजमा करीत असले तरी जपान सरकारच्या प्रवक्तयाने मात्र गोटोची हत्या झाल्याबाबत फार संशय नाही असे सांगितले. गोटोच्या बदल्यात कैद्यांना सोडण्याच्या वाटाघाटीत जपानला यश आले नाही, त्यामुळे अखेर गोटोला मृत्यूस सामोरे जावे लागले.