नवी दिल्ली : आयसिसची विचारसरणी पुढे नेण्यासाठी आणि भारतात बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी त्या दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या एका डॉक्टरविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अब्दुल रेहमान असे बंगळूरुतील या डॉक्टरचे नाव आहे.
सहआरोपी जहानझेब सामी वानी आणि अन्य यांच्यासह अब्दुल रेहमान याने भारतात फुटीर आणि देशविरोधी कारवाया केल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. यापूर्वी श्रीनगर येथील हिना बशीर बेग आणि वानी, हैदराबाद येथील अब्दुल्ला बासित आणि पुण्याच्या सादिया अन्वर शेख आणि नाबील सिद्दीक खत्री यांच्याविरुद्ध २ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वानी आणि त्याची पत्नी बेग हे आयसिसशी संबंधित इस्लामिक स्टेट खोरासन प्रॉव्हिन्सशी (आयएसकेपी) संलग्न असून ते भारतात फुटीर आणि देशविरोधी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याबद्दल त्यांना मार्च २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. रेहमान याला ऑगस्ट २०२० मध्ये बंगळूरुत अटक केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:35 am