‘द इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेने अमेरिकेचा मदत कार्यकर्ता पीटर कासिग याच्यासह सीरियातील १८ नागरिकांचा शिरच्छेद केला आहे. नुकतीच या संदर्भातील चित्रफीत या दहशतवादी संघटनेने प्रसिद्ध केली आहे.
पीटर कासिग हा पूर्वी अमेरिकी सैन्य दलातील सैनिक होता. त्याने सीरियातील यादवी युद्धात वैद्यकीय मदत dv05करण्याचे काम सुरू केले होते. मात्र इसिसच्या दहशतवाद्यांनी सीरियातून त्याचे अपहरण केले आणि त्याला ठार केले. ‘‘तुमच्या पहिल्या सैनिकाला आम्ही ठार केले आहे. आता इतरांनाही दागिक येथे आणून मारण्याची आम्ही वाट पाहत आहोत,’’ असे या चित्रफितीमध्ये दहशतवाद्यांकडून सांगण्यात आले.
यापूर्वी दोन अमेरिकी पत्रकारांचा आणि दोन ब्रिटिश नागरिकांचा इसिसच्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला होता. एका कृष्णवर्णीय दहशतवाद्याने या नागरिकांचा शिरच्छेद केला होता. त्याच दहशतवाद्याने कासिगसह १९ जणांना ठार केले.
अमेरिकेकडून निषेध
 दहशतवाद्यांनी कासिगसह १९ नागरिकांचा  शिरच्छेद केल्याच्या घटनेला अमेरिकी प्रशासनानेही दुजोरा दिला आहे. कासिगच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या दु:खात अमेरिकी प्रशासन सहभागी असून, दहशतवाद्यांना याची किंमत मोजावी लागेल, असे राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते मीहान यांनी सांगितले.