इस्लामिक स्टेटच्या (आयसिस) दहशतवाद्यांनी प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊस उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये पॅरिसमध्ये आणखी हल्ले घडवून आणले जातील, असेही या व्हिडीओतील आयसिसच्या दहशतवाद्याने म्हटले आहे.
इराकमध्ये दिजला प्रांतामध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या सहा मिनिटांच्या व्हिडीओला ‘पॅरिस बिफोर रोम’ असे नाव देण्यात आले आहे. वॉशिंग्टनमधील एका माध्यम विषयक संस्थेने याबद्दल माहिती दिली. व्हिडीओमधील आयसिसचा दहशतवादी नेहमीच्या शैलीत फ्रान्समध्ये आणखी हल्ले करण्याची धमकी देतो. फ्रान्समधील प्रसिद्ध स्मारकांवर पुढील काळात हल्ले केले जातील. त्याचबरोबर व्हाईट हाऊसमध्येही हल्ले केले जातील, अशी धमकी देण्यात आली आहे.
आम्ही तुमच्यापासून सुरुवात केली आणि शेवट व्हाईट हाऊसमध्ये करू, अशीही टिप्पणी दहशतवाद्याने केली आहे. इराकमधील अनेक ठिकाणे ज्या पद्धतीने उडवून देण्यात आली, त्याच पद्धतीने तुमच्याकडेही हल्ले केले जातील, असे त्याने म्हटले आहे.