इस्त्रायलने आपण ज्यू राष्ट्रच आहोत अशीच घोषणा केली आहे. यासाठी गुरूवारी एक कायदा पास करण्यात आला आहे. आमचे मत किंवा हक्क मांडण्याचा अधिकार आम्हालाच आहे असे ज्यू समुदायाने म्हटले आहे. या नव्या कायद्यामुळे देशातील अरब नागरिकांसह इतरांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. संसदेतील ६२ सदस्यांपैकी ५५ जणांनी ज्यू राष्ट्राच्या बाजूने मतदान केले.

हिब्रू ही इस्त्रायलची राष्ट्रीय भाषा असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. तर अरबी भाषेला फक्त विशेष भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार ज्यू नागरिकांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असणार आहे. इस्त्रायलच्या राजधानीत या संदर्भातली घोषणा करण्यात आली. एवढेच नाही तर हिब्रू कॅलेंडर हे अधिकृतरित्या राष्ट्रीय कॅलेंडर असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. हा कायदा आम्ही आमच्या मूलभूत असित्त्वाचा विचार करून लागू केला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांनी म्हटले आहे. हे आमचे ज्यू राष्ट्र आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असेही नेत्यानाहू यांनी म्हटले आहे.

इस्त्रायल हे ज्यू राष्ट्र आहे आणि आम्हाला आमच्या सगळ्या नागरिकांचा आणि त्यांचा नागरिकांचा आदर आहे असेही नेत्यानाहू यांनी स्पष्ट केले. काही लोक असे आहेत ज्यांनी आमच्या अस्तित्त्वावरच संशय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही कायदा लागू करून अशांना आमचे उत्तर दिले आहे. आता इस्त्रायल हे ज्यू राष्ट्रच असणार आहे, यासाठी आम्ही भाषा आणि ध्वज यांचीही निवड केली आहे असेही नेत्यानाहू यांनी स्पष्ट केले.

हा कायदा पास होत असताना संसदेत अरब खासदारांनी या कायद्याचा कडाडून विरोध केला. एका अरब खासदाराने इस्त्रायलमध्ये लोकशाहीची हत्या झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.