सीरियामध्ये छुप्या पद्धतीची लढाई लढणाऱ्या इस्त्रायलने प्रथमच जाहीरपणे सीरियातील इराणच्या तळावर जोरदार मिसाईल हल्ले केले आहेत. सीरियामध्ये तैनात असलेल्या इराणी सैन्याच्या तळावरुन इस्त्रायलच्या गोलान हाईटसवरील सैन्य चौक्यांवर २० रॉकेटस डागण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने इराणच्या तळांना लक्ष्य केले आहे.

इस्त्रायलने प्रथमच इराणविरोधात अशा प्रकारची मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर असलेले अणूकरार संपवल्यानंतर दोनच दिवसात अशा प्रकारची कारवाई झाली आहे. हा तणाव आणखी वाढला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकू शकते.

इराणने डागलेले चार रॉकेटस इस्त्रायलच्या आर्यन डोन एअर डिफेन्स सिस्टीमने निष्फळ केले. अन्य रॉकेटसचा सीरियन प्रदेशातच स्फोट झाला असे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे. या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे इस्त्रायलने म्हटले आहे. इस्त्रायलने सीरियामधील इराणच्या शस्त्रसाठयाचे तळ तसेच गुप्तचरांच्या भेटीगाठीच्या तळांना लक्ष्य केले. सीरियाच्या पाच एअर डिफेन्स सिस्टीमही नष्ट केल्याचे इस्त्रायलने म्हटले आहे.

सीरियामधील इराणचे जे लष्करी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यालाच इस्त्रायलने लक्ष्य केले. आम्हाला हा तणाव आणखी वाढवायचा नाही पण सीरियामध्ये इराणला इस्त्रायलविरोधात तळ बनवू देणार नाही असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. इस्त्रायलने मे १९७४ साली सीरियाबरोबर करार केला होता. त्यानंतर प्रथमच इस्त्रायलने सीरियामध्ये अशा प्रकारची मोठी लष्करी कारवाई केली आहे. या हल्ल्याला उत्तर देण्याच्या फंदात पडू नका अशा इशाराच इस्त्रायलने सीरियाला दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच इराण बरोबरच अणू करार संपवला. या निर्णयाचे सौदी अरेबिया आणि इस्त्रायल या दोनच देशांनी स्वागत केले आहे.