पॅलेस्टिनी हल्लेखोराने बुधवारी एका बसमध्ये १२ इस्रायली लोकांना भोसकून जखमी केले व नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. जखमींपैकी चार जण गंभीर असून बस चालकासह इतर आठ जण जखमी आहेत, असे प्रवक्ते मॅगेन डेव्हीड अ‍ॅडॉम यांनी सांगितले.
पोलिसांनी या हल्ल्याची चित्रे प्रसृत केलेल्या छायाचित्रात मोठे चाकू जमिनीवर पडलेले दिसत आहेत. मेनाशेम बेगिन रस्त्यावर एका बसमध्ये दक्षिण तेल अविव येथे हा हल्ला झाला. हल्लेखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पाठलाग करून त्याला गोळ्या मारण्यात आल्या. नंतर त्याला रूग्णालयात नेऊन जबाब नोंदवण्यात आले. तो २३ वर्षांचा हल्लेखोर असून पश्चिम किनारा भागातील तुलकराम भागातील आहे. तो बेकायदेशीररीत्या इस्रायलमध्ये राहत होता, असे अंतर्गत सुरक्षा मंत्री यित्झ्ॉक अहारोनोविच यांनी सांगितले. कामाचा व्हिसा नसताना तो हल्लेखोर इस्रायलमध्ये होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचे मिकी रोसेनफेल्ड यांनी सांगितले. दरम्यान, इस्लामिस्ट हमासने या हल्ल्याचे स्वागत करताना हे शौर्य कृत्य असल्याचे सांगितले. सकाळी हा हल्ला झाला असून पॅलेस्टिनी लोकांवरील अत्याचारांचा हा परिणाम आहे, असे इझ्झत अल रिश्क या हमासच्या सदस्याने सांगितले.
ज्या अधिकाऱ्याने या हल्लेखोरास जेरबंद केले त्याच्याशीही नेत्यानाहू बोलले आणि अनेकांचे प्राण वाचविल्याबद्दल त्याचे कौतुकही केले.

*गेल्या जूनमध्ये पश्चिम पट्टी क्षेत्रात इस्रायलने पुनर्वसन केलेल्या तिघांची अतिरेक्यांनी अपहरणानंतर हत्या केल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष विकोपाला.
*यातून धुमश्चक्रीला तोंड फुटले आणि तब्बल ५० दिवस हल्ले-प्रतिहल्ले सुरू झाले. त्यात पॅलेस्टाईनच्या २,१०० तर इस्रायलच्या ७१ जणांचा मृत्यू ओढवला.
*नोव्हेंबरमध्ये जेरुसलेमलगत हरनोफ येथे ज्यूंच्या एका प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यात इस्रायलच्या पाच नागरिकांची हत्या झाली आणि अनेकजण जखमी झाले.

इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन जे विष पसरवत आहे, त्यातूनच हा दहशतवादी हल्ला झाला आहे. याच दहशतवादाचा सामना जगाला पॅरिसमध्ये, ब्रुसेल्समध्ये आणि अन्यत्र करावा लागत आहे. इस्रायलच्या स्थापनेपासूनच आम्हाला अशा दहशतवादाचा सामना करावा लागत असून त्यांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवू.
बेन्यामिन नेत्यानाहू, इस्रायलचे पंतप्रधान