इस्राईलमध्ये करोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आलं आहे. यावेळी इनडोरमध्येही मास्क बंधनकारक केलं आहे. इस्राईलमध्ये गुरुवारी १६९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून आतापासून पावलं उचलण्यात सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांना अनावश्यक प्रवास करणे टाळण्यास सांगितलं आहे. तसेच लहान मुलांना घेऊन विमान प्रवास करू नका, असं सांगण्यात आलं आहे. करोनाची लस घेतली असेल आणि करोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास करोना चाचणी करण्याच्या सूचना देखील सरकारने दिल्या आहेत. इस्राईलमध्ये ८० टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतरही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

इस्राइलच्या बिन्यामिना शहरात सर्वाधिक १२२ सक्रिय रुग्ण आहेत. या शहरात रेड झोन घोषित करण्यात आला आहे. तर मोदीनितमध्ये ७१ सक्रिय रुग्ण आहेत. तेल अवीव आणि केफर सबातमध्ये ३६, येरुसेलममध्ये ३३, कोचव यारमध्ये ३१ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या २६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

भारतात डेल्टा प्लसचे ५० रुग्ण, ‘या’ ८ राज्यांना खबरदारीचा इशारा

इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कवरील बंधनं शिथिल करण्यात आली होती. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता करोना रुग्ण वाढत असल्याने मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासोबत देशात विदेशी पर्यटकांची लसीकरण मोहिम ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. इस्राईलमध्ये करोनामुळे ६ हजार ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्राईलची लोकसंख्या ९.३ मिलियन इतकी आहे.