करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यामध्ये पहिल्या ३० व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे. इस्रायलमध्ये वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या Inovytec ने हे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. दर आठवडयाला शंभर व्हेंटिलेटर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या या कारखान्यात अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘अॅरो’ मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सॅटलाइटची निर्मिती केली जाते. मागच्यावर्षी इस्रायलने सुद्धा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मानवरहीत यानाची निर्मिती सुद्धा इथेच करण्यात आली होती. मिसाइल निर्मिती तळावर व्हेंटिलेटरचे उत्पादन सुरु करणे कठिण होते असे डॉक्टर दानी गोल्ड यांनी सांगितले. इस्रायलमध्ये ५,३०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 5:58 pm