काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या शास्त्रज्ञांचं शिष्टमंडळ भारतीय शास्त्रज्ञासोबत करोनाच्या रॅपिड चाचण्यांसंदर्भात संशोधन करम्यासाठी भारतात आलं आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्रालयातील काही शास्त्रज्ञांना या शिष्टमंडळात समावेश होता. शुक्रवारी हे शिष्टमंडळ आपल्या मायदेशी परतलं. भारतात दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांकडून २० हजारांहून अधिक जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसंच त्यांचे नमूनेही गोळा करण्यात आले.

दरम्यान या नमून्यांचा अभ्यास करून करोना विषाणूचा प्रादुर्भाव कसा आटोक्यात आणता येईल, यावर ते काम करणार आहे. तसंच इस्रायल लवकरच रॅपिट चाचण्यांचं तंत्र विकसित करण्याची शक्यता असून भारतालाही त्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

“भारतीय शास्त्रज्ञांसोबत भविष्यकाळातही अन्य विविध क्षेत्रांमध्ये आम्ही काम करू,” अशी प्रतिक्रिया इस्रायलचे भारतातील राजदून एच.ई.रॉन माल्का यांनी दिली. “करोना विषाणूसोबतच अन्य क्षेत्रांमधील सहकार्य भारत आणि इस्त्रायलसह जगभरातील सर्व देशांसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकतं. या महामारीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत आहेत,” असंही ते म्हणाले.