इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बायडन यांनी या संघर्षासंदर्भात भाष्य करताना इस्रायलला आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे. बुधवारी रात्री बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. गाझा पट्ट्यामध्ये इस्रायल आणि हमासचा २०१४ नंतरचा सर्वात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना, “हा संघर्ष लवकरच संपेल अशी मला आशा आहे,” असं स्पष्ट केलं तसेच, “जेव्हा इस्रायलच्या सीमा ओलांडून हजारो रॉकेट त्यांच्यावर हल्ला करण्यात येत असेल तर त्यांना स्वत:चं संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे,” असंही बायडन म्हणालेत.

इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असणारा हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने इजिप्त आणि कतारमध्ये आपले राजकीय दूत पाठवले आहेत. चर्चेमधून हा संघर्ष शांत करण्याला अमेरिकेचं प्राधान्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून इस्रायलवर हमासने रॉकेटच्या माध्यमातून हल्ले केले. इस्रायलनेही याचं जश्यास तसं उत्तर देत हमासवर एअर स्ट्राइक केला. दोन्हीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपासून हा संघर्ष सुरु असून मरण पावलेल्या ६० जणांमध्ये सर्वाधिक पॅलेस्टिनी लोकांचा समावेश आहे. यामध्ये इस्रायलच्या सहा जणांचाही मृत्यू झालाय. बुधवारी सायंकाळी हमासकडून तेल अवीववर रॉकेट हल्ले करण्यात आले. इस्रायलमधील तेल अवीव हे आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्वाचं शहर आहे.

याचसंदर्भात बोलताना इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासला या आक्रामकतेची खूप किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. इस्रायलने हमासला उत्तर देताना गाझा पट्ट्यातील अनेक इमारतींवर हल्ले केले. या हल्ल्यांच्या व्हिडीओंमध्ये इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी बुधवारी कतारचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांच्याशी चर्चा केली. त्याबरोबर अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटोनी ब्लिंकेन यांनी पॅलेस्टिनीचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या परिसरामध्ये शांतता कायम ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मत अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केलं.

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे की ही फक्त सुरुवात आहे. “ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांमध्ये हमासच्या काही वरिष्ठ कमांडर्सला आम्ही लक्ष्य करणार आहोत,” असंही नेतन्याहू यांनी सांगितलं आहे. इस्रायल आणि हमासमधील या युद्धामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एकीकडे इराणसहीत सर्व इस्लामिक देशांनी इस्रायलवर टीका केली असतानाच दुसरीकडे अमेरिकने इस्रायलचं समर्थन केलं आहे.