इस्रायलमध्ये सध्या भीषण अशी युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊ लागली आहे. इस्रायल सरकार आणि पॅलेस्टिनींमध्ये सुरू असलेला हा संघर्ष अधिकच चिघळत असल्याचं दिसत असताना भारत सरकार या वादामध्ये घेत असलेल्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका भाषणाची व्हिडिओ क्लिप ट्विट केली असून भाजपाप्रणित केंद्र सरकारला वाजपेयींचं भाषण ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलंय आव्हाडांनी ट्वीटमध्ये?

जितेंद्र आव्हाड यांनी संध्याकाळी ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला आहे. “आज इस्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी आपले पितासमान पंडित अटल बिहारी वाजपेयी यांचं हे भाषण ऐकून घ्यावं.’इस्रायलने आक्रमण करून अरबांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे. त्यांना पॅलेस्टिनींची जमीन सोडावी लागेल’- माजी पंतप्रधान पंडित अटल बिहारी वाजपेयी”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

रॉकेट हल्ल्यात गाझापट्टीत १० ठार; इस्रायलविरोधात अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली

काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी स्टेजवरून केलेल्या एका जुन्हा भाषणाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये वाजपेयींनी इस्रायलविषयी भाजपाची भूमिका मांडली आहे. “जर भाजपाचं सरकार आलं, तर ते अरबांची साथ देणार नाही, इस्रायलचा साथ देईल. मोरारजीभाई देसाईंनी हे स्पष्ट केलं आहे. पण गैरसमज दूर करण्यासाठी मी हे स्पष्ट करून देऊ इच्छितो, आम्ही प्रत्येक मुद्द्याला गुण आणि दुर्गुणांच्या बाजूने पाहू. पण मध्यपूर्वेच्या बाबतीत ही स्थिती स्पष्ट आहे की अरबांच्या जमिनीवर इस्रायलनं अतिक्रमण केलं आहे त्यांना ती जमीन सोडावी लागेल. ही आक्रमक भूमिका आम्हाला आमच्या संबंधांमध्ये स्वीकार नाही. जो नियम आमच्यावर लागू आहे तो इतरांनाही लागू असेल. अरबांची जमीन खाली झाली पाहिजे. पॅलेस्टिनींच्या अधिकारांची स्थापना झाली पाहिजे. इस्रायलचं अस्तित्व तर अमेरिकेसह आम्हीही मानलं आहे. पण मध्य पूर्वेच्या समस्येवर असा तोडगा काढावा लागेल, जो आक्रमण संपुष्टात आणेल आणि शांती प्रस्थापित करेल”, असं वाजपेयींनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

 

“गैरसमजाचा प्रश्नच नाही. पण कदाचित मी माझ्या अधिकारांचं उल्लंघन करतोय. नवे परराष्ट्रमंत्री याविषयी अधिक माहिती देतील. पण माझा संबंध एका अशा पक्षाशी राहिला आहे की ज्याच्या नावाने निवडणुकीत असं सांगितलं जात होतं की जनता पक्षावर जनसंघाचा प्रभाव आहे आणि जनसंघ मुस्लिमविरोधी आहे. पण कुणीही या खोट्या प्रचाराला बळी पडलेलं नाही”, असं देखील वाजपेयी या व्हिडिओमध्ये पुढे म्हणत आहेत.

Explained: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष का सुरु आहे?; जाणून घ्या चार प्रमुख कारणं

काय सुरू आहे गाझापट्टीत?

आधी पॅलेस्टिनी हमासनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. मात्र, इस्त्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टिम या प्रणालीने १०० हून जास्त क्षेपणास्त्रे आकाशातच निकामी केली. पण त्यानंतर इस्रायलनं गाझा पट्टीमध्ये ६०० हून जास्त ठिकाणी हल्ले केल्याची माहिती असोसिएट प्रेसनं दिली आहे. अजूनही दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच असून यामध्ये दोन्ही बाजूंकडील जनतेमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine conflict in gaza belt jitendra awhad tweet atal bihari vajpeyee old video pmw
First published on: 15-05-2021 at 20:11 IST