इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी गुप्तपणे सौदी अरेबियाचा दौरा केला. त्यांनी तिथे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. त्यावेळी सौदीमध्येच असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांची सुद्धा नेतान्याहू यांनी भेट घेतली. इस्रायलच्या कान पब्लिक रेडिओ आणि आर्मी रेडिओने सोमवारी ही माहिती दिली.

नेतान्याहू यांचे कार्यालय आणि जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने लगेच यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असे रॉयटर्सने म्हटले आहे. एका इस्रायली वर्तमानपत्रात एव्हिएशन ट्रॅकिंग डाटा प्रसिद्ध झाला. त्यात तेल अविववरुन उड्डाण केलेल्या एका बिझनेस जेटने सौदी अरेबियाच्या नियोम शहरामध्ये लँडिंग केल्याची माहिती देण्यात आली आहे. तिथे रविवारी बिन सलमान आणि पॉम्पिओ यांची नियोजित बैठक होणार होती.

संयुक्त अरब अमिराती, बहरीनप्रमाणे सौदीने सुद्धा इस्रायल बरोबर औपचारिकसंबंध प्रस्थापित करावेत, यासाठी पॉम्पिओ यांचे प्रयत्न सुरु आहेत. इराणबद्दल चिंता असल्याने अमेरिकेकडून खाडी देश आणि इस्रायलमध्ये मैत्री घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पॅलेस्टाइच्या मुद्यावरुन सौदी अरेबियाने आतापर्यंत इस्रायल बरोबर सामान्य संबंध प्रस्थापित करायला नकार दिला होता. पॅलेस्टाइनचा प्रश्न मार्गी लावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सौदीने त्यांच्या हवाई हद्दीतून इस्रायली विमानांना उड्डाणाची परवानगी दिली आहे.