राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ज्यू नागरिकांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर इस्रायली अधिकाऱ्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करणारे ज्यू विश्वासघातकी आहेत असे विधान ट्रम्प यांनी केले होते. ट्रम्प यांच्या दबावाखील असलेल्या इल्हन उमर आणि रशिदा तलैब या डेमोक्रॅटसच्या प्रतिनिधींना मागच्या आठवडयात इस्रायलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.

माझ्या मते डेमोक्रॅटसना मत देणाऱ्या ज्यू लोकांना काही माहित नाहीय किंवा ते विश्वासघातकी आहेत असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या विधानावर अमेरिकेतील ज्यू लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पण इस्रायलच्या सरकारने यावर थेट विरोधी भूमिका घेणे टाळले आहे. कारण इस्रायलच्या सरकारचे ट्रम्प प्रशासनाबरोबर चांगले संबंध आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ऊर्जा मंत्री युवल स्टीनिझ यांनी अमेरिकेच्या राजकारणात आपण हस्तक्षेप करु नये. आमचे डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन दोघांबरोबर चांगले संबंध आहेत आणि ते तसेच राहिले पाहिजेत अशी प्रतिक्रिया दिली.

ट्रम्प मागच्या काही काळापासून इल्हन उमर आणि रशिदा तलैब यांच्यासह काही डेमोक्रॅट सदस्यांना लक्ष्य करत आहेत. या महिला सदस्य इस्रायलच्या विरोधात मतप्रदर्शन करत असतात. उमर आणि तलैबच्या मतांशी बहुतांश डेमोक्रॅटस सहमत नाहीत. पण ट्रम्प यांच्याकडून सातत्याने त्यांच्यावर टीका होत असल्यामुळे त्यांना पक्षांतर्गत पाठिंबा मिळत आहे.