अमेरिकेत कॅलिफोर्नियातील बेरनार्दिनो येथे सय्यद रिझवान फारूक व त्याच्या पत्नीने डिसेंबर महिन्यात १४ जणांना ठार केले होते व नंतर स्वत:ही गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्या दांपत्याचा मोबाईल नंतर सापडला होता; तो आयफोन होता व त्यातील माहिती उघड करण्यास अ‍ॅपल कंपनीने नकार दिल्यानंतर अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संस्थेने तो फोन हॅक केला. पण ते करण्यात त्यांना कुणी मदत केली हे आता स्पष्ट झाले असून इस्रायलमध्ये लष्करी सेवांसाठी खास मोबाईल तयार करणाऱ्या सेलेब्राईट या सायबर सुरक्षा कंपनीने हा फोन हॅक करण्यात म्हणजे त्याची संकेतावली उलगडून त्यातील माहिती घेण्यास मदत केली आहे. या फोनला जे पासवर्ड लॉक असते ते तोडण्यात एफबीआयने जे यश मिळवले त्यात इस्रायलचा वाटा आहे. इस्रायलची सेलेब्राईट ही कंपनी विशिष्ट प्रकारचे मोबाईल बनवते व त्यांना मोबाईलचे कोड नंबर शोधण्याचे कौशल्य प्राप्त आहे. आम्ही एफबीआयला फोन हॅक करण्यात मदत केली हे खरे आहे, पण यावर आम्ही आणखी काही बोलू शकत नाही. आमच्याकडे एक असे साधन आहे, की ज्याच्या मदतीने आयफोन पाच सी या फोनमधील माहिती आम्ही काढू शकतो किंवा त्याचे सांकेतांक उलगडू शकतो. हाच हँडसेट त्या मुस्लीम दांपत्याकडे होता त्यामुळे तो हॅक करणे आम्हाला अवघड नव्हते, असे कंपनीने म्हटले आहे. या फोनचा सांकेतांक उघड करण्यास अ‍ॅपलने नकार दिला होता. न्यायालयानेही व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर अ‍ॅपलने हा सांके तांक उघड करण्याची गरज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर एफबीआयने तो हॅक केला होता व त्यातील सगळी माहिती आता उघड झाली आहे. तो फोन वापरणारे मुस्लीम दांपत्य हे दहशतवादी कारवायात सामील होते. यात साधा पासकोड असले तर माहिती काढणे सोपे जाते पण गुंतागुंतीचा पासवर्ड असेल तर इमेल किंवा कीचेनला न जाता वेगळ्या पद्धतीने माहिती उघड करता येते, असे सेलेब्राईटचे म्हणणे आहे. मास्टर पासवर्ड माहीत असेल तर कीचेन या अ‍ॅपल मोबाईलवरील उपयोजनाने त्यावरील सगळी माहिती काढून घेता येते. आयफोन पाच सी या मोबाईलवर जर आयओएस ९ प्रणाली वापरली असेल तर माहिती उघड करता येते का, हे सेलेब्राईट कंपनीने सांगितले नाही. सेलेब्राईट या जपानच्या सन कार्पोरेशनच्या उप कंपनीने डाटा फोरेन्सिक करार २०१३ मध्ये एफबीआयबरोबर केले आहेत. ट्विटरवर मिळालेल्या माहितीनुसार आताच्या प्रकरणात या कंपनीशी कॅलिफोर्निया ऐवजी शिकागो येथे दोनच दिवसांपूर्वी १५ हजार डॉलर्सचा करार एफबीआयने केला होता. कंपनीने म्हटले आहे की, उत्तर अमेरिकेतील डिजिटल साधनातील माहिती उघड करण्याची पन्नास टक्के बाजारपेठ आमच्या हातात आहे. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक रोनेन एंगलर यांनी सांगितले की, आम्ही संबंधित मोबाइल किंवा कुठलेही डिज़िटल साधन हातात आल्यानंतर विविध पातळ्यांवर त्यातून माहिती काढून घेतो. मोबाईलचे लॉक न उघडताही आम्हाला त्यातून माहिती काढण्याचे तंत्र माहिती आहे. नॉर्थ वेल्स पोलिसांना आयफोन ३ जीएसमधील डिलीट केलेल्या संदेशातील माहिती खुली करण्यास याच कंपनीने मदत केली होती. लंडनमध्ये पुढील महिन्यात फोरेन्सिक युरोप प्रदर्शन होत असून त्यात मोबाईल व इतर डिजिटल माहिती उघड करण्याचे अनेक उपाय प्रत्यक्ष दाखवले जाणार आहेत, अर्थात सायबर गुन्हे शाखांना त्याचा मोठा उपयोग आहे.