ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी आलेल्या इस्त्रायली विद्यार्थिनीची निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली आहे. तरुणी फोनवरुन तिच्या बहिणीबरोबर बोलत असताना अचानक हल्ला करुन तिची हत्या करण्यात आली. अय्या मासार्वे (२१) असे मृत तरुणीचे नाव असून पोलिसांनी मारेकऱ्याला शोधून काढण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

मेलबर्न विद्यापीठाजवळ बुधवारी तिचा मृतदेह सापडला. याच विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. आमच्या शहरात आलेल्या निर्दोष तरुणीवर झालेला हा भयानक हल्ला आहे असे या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक अँड्रयू स्टॅम्पर यांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास अय्या मासार्वे तिच्या घराच्या दिशेने जात होती.

फोनवरुन बहिणीबरोबर बोलत असताना अचानक तिच्यावर हल्ला झाला. फोन हातातून खाली पडल्याचा आवाज तिच्या बहिणीने ऐकला असे स्टॅम्पर यांनी सांगितले. अय्या ट्राममधून ज्या स्टॉपवर उतरली तिथून ५० मीटर अंतरावर सकाळी सातच्या सुमारास सर्वप्रथम एका वाटसरुने तिचा मृतदेह पाहिला.

अय्यावर लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न झाला होता का ? त्याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत. काळया रंगाची बेसबॉलची कॅप आणि राखाडी रंगाचा टी-शर्ट पोलिसांना घटनास्थळी मिळाला. आरोपीने हा टी-शर्ट घातला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याआधी सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये वर्णद्वेषाच्या भावनेतून अनेक भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत.