बेंगळुरू : भारताच्या चंद्रयान- २ मोहिमेत १३ पेलोडचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय त्यात नासाच्या एका  प्रयोगाचाही समावेश आहे, असे बुधवारी सांगण्यात आले. भारताचे चांद्रयान जुलैत सोडले जाणार आहे.

इस्रोने म्हटले आहे, की चंद्रयान मोहिमेत एकूण तेरा पेलोड असून त्यात ८ ऑर्बिटरमध्ये, तीन लँडरमध्ये तर दोन रोव्हरमध्ये असतील.

अवकाशयानाचे तीन भाग असून त्यात ऑर्बिटर व लँडर (विक्रम) तसेच रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. ९ जुलै ते १६ जुलै २०१९ मध्ये उड्डाणास अनुकूल काळ असून हे यान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. ऑर्बिटरचा वेग १०० कि.मी राहील.  लँडर विक्रम हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करणार आहे. रोव्हर प्रज्ञान हे काही प्रयोग करणार आहे. जीएसएलव्ही मार्क तीन प्रक्षेपकाच्या मदतीने हे उड्डाण केले जाणार असून ऑर्बिटर व लँडर हे एकमेकांशी जोडलेले असतील. ते पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेतून नंतर चंद्राकडे कूच करील. त्यानंतर लँडर हे ऑर्बिटरमधून वेगळे होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे सोडले जाईल. रोव्हर या बग्गीसारख्या गाडीच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग करण्यात येणार आहे.लँडर व ऑर्बिटर या दोन्हीवर उपकरणे लावण्यात आलेली आहेत. त्यांच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. इस्रोचे अध्यक्ष के.सिवान यांनी सांगितले, की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कुणी गेलेले नाही, तिथे आम्ही जात आहोत.

प्रगत चंद्रयान मोहीम

चंद्रयान- २ ही दहा वर्षांपूर्वीच्या चंद्रयान -१ मोहिमेशी निगडित अशी ही सुधारित मोहीम आहे. चांद्रयान १ मध्ये ११ पेलोड होते, त्यात भारताचे पाच, युरोपचे तीन, अमेरिकेचे २, बुल्गारियाचे १ असे पेलोड होते. ते अवकाशयान १.४ टनांचे होते व पीएसएलव्ही म्हणजे ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते.