चंद्राच्या कक्षेत प्रवेश; आता लक्ष ७ सप्टेंबरच्या यशाकडे

चांद्रयान २ हे चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात मंगळवारी यश आले. या मोहिमेतील हा पहिला अवघड टप्पा असल्याने ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात काळजाचे ठोके चुकण्याचाच अनुभव आला, असे इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली. यानावरील द्रव इंधन इंजिने प्रज्वलित करून हे यान कक्षेत प्रस्थापित करण्यात आले, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने स्पष्ट केले. एकूण १७३८ सेकंदात यान चंद्राच्या कक्षेत नेण्यात यश आले.  चांद्रयानाचे अलगद अवतरण करण्यात यश येईल, हा विश्वास के. शिवन यांनी व्यक्त केला.

१४ ऑगस्टला हे यान चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. चांद्रयान २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम असून त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय व खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान १ च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर,  लँडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाल एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो.

यानंतरचे सर्वच टप्पे यापेक्षाही महत्त्वाचे आहेत. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० कि.मी. उंचीच्या कक्षेत हे यान यानंतर प्रस्थापित करण्यात येईल. त्यानंतर लँडर हे ऑर्बिटरपासून वेगळे होऊन १०० कि.मी. बाय ३० कि. मी. कक्षेत येईल. नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते ७ सप्टेंबरला अलगदपणे उतरेल. यापुढे  त्याची कक्षा सुधारण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान केला जाणार आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-२ चा वेग कमी करण्यात आला आहे.

चंद्रावर ७ सप्टेंबरला यानाचे अलगद अवतरण करण्याचा काळ हा जास्त थरारक असणार आहे. कारण तसा प्रयत्न (चंद्रावर यान उतरवण्याचा)  इस्रोने पूर्वी कधी केलेला नाही. आतापर्यंत चांद्रयान कक्षेत पाठवण्यापर्यंतचा अनुभव इस्रोच्या गाठीशी आहे. त्यामुळे यापुढील टप्पा हा खरा कौशल्याचा आणि ताणाचा आहे.

–  के. शिवन, इस्रोचे अध्यक्ष