इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी त्यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

के सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता. त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं. हलाकीच्या परिस्थितीमुळे लहानपणी त्यांना पायात कधीही चपला किंवा बूट घालता आले नव्हते. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण धोतर घालूनच जात होतो, असंही त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एमआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पँट परिधान केली होती.