संस्थेचा राज्यातील पहिलाच प्रकल्प

पनवेल तालुक्याच्या वेशीवरील रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी (एचओसी) डबघाईस आल्याने या कंपनीचा काही भाग भारत पेट्रोलियम कंपनी व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्यामुळे इस्रोमधून होणाऱ्या संशोधनानंतर अवकाशोड्डाणात जमिनीवरून सुटणाऱ्या उपग्रहात रसायनी येथून उत्पादन केलेले इंधन भरले जाणार आहे. यापूर्वी हे इंधन एचओसी कंपनीतून इस्रोला मिळत होते. मात्र इस्रो आता यापुढे स्वत:च या कच्च्या मालाची उत्पादन निर्मिती करून अवकाशोड्डाण करून उपग्रह पाठविणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या प्रकल्पामुळे पनवेलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असून भविष्यातील देशाच्या अवकाशझेपेमध्ये पनवेलचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

एचओसी कंपनीच्या तीनशे एकर जागेवरील कारखान्यातील २० एकर जागेवरील महत्त्वाचा प्रकल्प इस्रोला व भारत पेट्रोलियम कंपनीला उर्वरित ४४२ एकर जागा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एचओसी कंपनी या प्रकल्पातून फीनोल, अॅसीटोन, नायट्रोबेन्झीन, अॅनीलाइन, नायट्रोटोलीन, नायट्रो सल्फरिक अॅसिड, नायट्रोक्लोरोबेन्झीन ही उत्पादने बनवत होती. त्यापैकी इस्रोच्या उपग्रहातील अवकाशोड्डाणात लागणारा एन २ वो फोर याचा कच्चा माल येथे बनविला जात होता. एचओसी कंपनी बंद झाल्याने हा कच्चा माल सुरुवातीच्या काळात इस्रो स्वत:च्या व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली या प्रकल्पातून बनविणार आहे. राज्यातील हा इस्रोचा पहिला प्रकल्प असणार आहे.

हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

एचओसी कंपनीने ४० वर्षांपूर्वी घेतलेल्या अकराशे एकर जागेपैकी तीनशे एकर जागेवर कंपनीने कारखान्यातील विविध प्रकल्प व कामगार आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी वसाहती येथे उभारून विस्तार केला. मात्र इतर जागेचा विकास न केल्याने या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात यासाठी शेतकऱ्यांचे नेते आणि स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर हे सरकारच्या प्रतिनिधींशी संघर्ष करत आहेत. केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे हा प्रकल्प होणार हे निश्चित असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संबंधित प्रकल्पाच्या हस्तांतरणाबाबतची परवानगीची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा असला तरी भाजप व सेनेच्या आमदारांचा याला विरोध आहे. येत्या काही महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगण्यात येत आहे.