ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने ब्राझीलचा ‘अ‍ॅमेझॉनिया १’ हा उपग्रह व इतर १८ उपग्रह रविवारी सकाळी यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे  या वर्षांतील हे पहिले प्रक्षेपण होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसेनारो यांचे त्यांच्या  देशाचा उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आल्याबाबत अभिनंदन केले आहे.

पीएसएलव्ही सी ५१ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण सकाळी १०.५४ वाजता सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या तळावरून करण्यात आले. अ‍ॅमेझॉनिया हा उपग्रह उड्डाणानंतर सतरा मिनिटांनी कक्षेत स्थापित झाला. दीड तासाने इतर उपग्रह कक्षेत सोडले गेले, त्यात चेन्नईच्या ‘स्पेस किड्स इंडिया’ या संस्थेचा उपग्रह असून त्याचे नाव ‘सतीश धवन उपग्रह’ असे आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरलेले आहे.

एका पाठोपाठ एक असे इतर १८ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी मोहीम यशस्वी झाल्याचे जाहीर केले व सर्व १९ उपग्रह कक्षेत प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.

अ‍ॅमेझॉनिया १ व इतर १८ उपग्रह रविवारी अवकाशात सोडण्यात आले.  पीएसएलव्ही सी- ५१ हा ध्रुवीय प्रक्षेपक व्यावसायिक स्वरूपाचा असून न्यूस्पेस इंडिया लिमिटेड या इस्रोच्या  व्यावसायिक संस्थेचा या मोहिमेत सहभाग  होता. ब्राझील सरकारच्या अधिकाऱ्यांनीही नियंत्रण कक्षात बसून हे शानदार उड्डाण अनुभवले. इतर १८ सह-उपग्रह यात होते. त्यात चार इस्रोच्या नॅशनल स्पेस प्रमोशन अ‍ॅथोरायझेशन सेंटरचे होते. ही संस्था तीन संस्थांची मिळून बनली आहे. एसकेआयचा एक उपग्रह व एनएसआयएलचे १४ उपग्रह यात होते. २५.५ तासांच्या उलटगणतीनंतर हे उड्डाण झाले. यातील ध्रुवीय प्रक्षेपक ४४.४ मीटर उंचीचा होता, त्याची ही ५३ वी मोहीम होती. आकाश स्वच्छ असल्याने हवामानाचे कुठलेही अडथळे या मोहिमेत आले नाहीत.

ब्राझीलचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मार्कोस पाँटीस यावेळी उपस्थित होते. त्यांनी हे प्रक्षेपण पाहिले. दोन्ही देशातील मजबूत भागीदारीची ही सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाच उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केलेले

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकूण पाच उपग्रहांचा यात समावेश होता. एसडी-सॅट हा प्रारणांच्या अभ्यासासाठीचा उपग्रह असून युनिटी सॅट हा उपग्रह विद्यापीठांनी तयार केला आहे. तो रेडिओ रिले सेवेसाठी आहे. सिंधू नेत्र हा उपग्रह बेंगळुरू येथील पीइएस विद्यापीठाने तयार केला आहे त्याचा उद्देश उपग्रह चित्रणातून संशयास्पद जहाजे ओळखण्याचा आहे. अ‍ॅमेझॉनिया १ हा उपग्रह ब्राझीलचा असून त्याचा कार्यकाल चार वर्षे आहे. अ‍ॅमेझॉनमधील जंगलतोडीचा अभ्यास त्यातून केला जाणार आहे. एसकेआयच्या उपग्रहावर पंतप्रधान मोदी यांचे चित्र असून २५ हजार लोकांची नावे आत तसेच डिजिटल स्वरूपातील भगवद्गीता आहे. ही मोहीम देशासाठी महत्त्वाची होती असे सांगून इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले की, आम्ही अनेक विद्यापीठांना उपग्रह निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. यात उद्योग व शैक्षणिक संस्था यापुढे स्वत:चे उपग्रह तयार करू शकतील. नवीन अवकाश सुधारणानंतर पाच उपग्रह तयार करण्यात आले होते. अवकाश खात्याने स्थापन केलेल्या एनएसआयएलचे हे पहिलेच उड्डाण होते.

अ‍ॅमेझॉनिया-१ उपग्रह

अ‍ॅमेझॉनिया उपग्रह  ६३७ किलो वजनाचा असून तो प्रकाशीय पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील हानीची माहिती घेण्याकरिता हा उपग्रह सोडण्यात आला आहे. ब्राझीलमधील शेतीच्या विविधतेचाही अभ्यास यात केला जाणार आहे.

उपग्रहावर मोदींचे चित्र !

एसकेआयच्या सतीश धवन उपग्रहावर भगवद गीता डिजिटल स्वरूपात ठेवलेली आहे. एसकेआयच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व अवकाश क्षेत्राच्या खासगीकरणात मोठी भूमिका पार पाडल्याने त्यांचे चित्र उपग्रहावर आहे.