भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून ( इस्त्रो) बुधवारी सकाळी सॅट २ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-३६ या प्रक्षेपकाद्वारे सॅट २ ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला. या उपग्रहाचे वजन १,२३५ किलो असून तो पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर फिरत राहणार आहे. अंतराळ मोहिमांमधील भारताची ही मोठी कामगिरी आहे.

सॅट-२ ए या उपग्रहाद्वारे जागतिक वापरकर्त्यांना  रिमोट सेन्सिंग डेटा सुविधा पुरविली जाईल. रिसोर्ससॅट श्रेणीतील हा तिसरा उपग्रह आहे. यापूर्वी २००३ मध्ये रिसोर्ससॅट -१ आणि २०११ मध्ये रिसोर्ससॅट-२ हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते. आता या दोन्ही उपग्रहांची कालमर्यादा संपुष्टात आल्याने सॅट २ ए त्यांची जागा घेणार आहे. सॅट- २ ए हा उपग्रह मुख्यत्तेकरून पृथ्वीवरील वनसंपदा, जलसंसाधने आणि खनिजे या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्त्रोतांची माहिती गोळा करण्याचे काम करतो. या उपग्रहाने पुरविलेल्या माहितीच्याआधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे नियोजन करण्यास मदत होते. रिसोर्ससॅट हा जगातल्या उत्तम रिमोट सेन्सिंग उपग्रहांपैकी एक आहे. जगातील अनेक देशांना या उपग्रहामार्फेत सेवा पुरविण्यात येते. इस्त्रोच्या पीएसएललव्ही-३६ या प्रक्षेपकाद्वारे हा सॅट-२ ए अवकाशात सोडण्यात आला. इस्त्रोच्या पीएसएललव्ही-३६ या प्रक्षेपकाची अवकाशात यशस्वीपणे उपग्रह सोडण्याची ही  ३८ वी वेळ आहे. १९९४ पासून २०१६ पर्यंत १८ वर्षांत पीएसएलव्हीच्या माध्यमातून ३६ यशस्वी प्रक्षेपणांतून १२१ उपग्रह अंतराळात सोडण्यात भारत यशस्वी झाला आहे. यापैकी ७९ उपग्रह परदेशी होते.