इस्रोने गुरुवारी आयआरएनएसएस-१एफ उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३२ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी३२ यान अवकाशात सोडण्यात आले आणि त्याने आयआयएनएसएस-१एफ हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला.
आयआरएनएसएस-१एफ हा सात उपग्रहांच्या मालिकेतील सहावा उपग्रह आहे. मालिकेतील पहिला उपग्रह जुलै २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. पीएसएलव्ही सी-३२ ने उपग्रह योग्य अंतराळकक्षेत सोडला आहे. पुढील महिन्यात मालिकेतील अखेरचा उपग्रह सोडण्यात येण्याची शक्यता आहे, असे इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी मोहीम नियंत्रण कक्षात सांगितले. सदर उपग्रहाच्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा आहे, आयआरएनएसएस यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित झाली आहे, सातवा उपग्रह सोडल्यानंतर ती अधिक कार्यक्षम होईल, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोदींकडून शास्त्रज्ञांचे कौतुक
भारताच्या आयआरएनएसएस-१एफचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. आपल्या सर्वासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीला मोदी यांनी ट्वीट करून सलाम केला आहे.