अंतराळ संशोधन संस्था इस्रो गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रोला मदत करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाही पुढे सरसावली होती. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे. अशातच इस्रोने ट्विट करत आपल्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले आहेत. विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगदरम्यान अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्याचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोकडून सतत विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चांद्रयान 2 या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील विक्रम लँडर हे ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा जमिनीवरील कंट्रोल रूमशी संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोकडून पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु गेल्या दहा दिवसापासून संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यानंतर नासाही इस्रोच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. परंतु नासाकडून अद्यापही कोणती माहिती देण्यात आली नाही. याचदरम्यान इस्रोने एक ट्विट केलं आहे.

जगभरातील भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांना घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत राहू, अशा आशयाचं ट्विट इस्रोने केलं आहे. तसंच यापूर्वी नासाही इस्रोच्या मदतीसाठी पुढे आली होती. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. विक्रम बरोबर संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्याचा थंडावा असतो. त्या वातावरणात लँडर, रोव्हर काम करण्याची शक्यता नाही. पृथ्वीवरचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लँडर, रोव्हरची रचना १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

नासाच्या या (एलआरओ) चंद्र मिशनची सुरुवात १८ जून २००९ साली झाली होती. अॅटलस व्ही रॉकेटने ऑर्बिटरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पाच दिवसांनी २३ जूनला नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. १५ सप्टेंबर २००९ ला ऑर्बिटरने आपले शोध कार्य सुरु केले. चंद्रावर खनिज असलेल्या साधन संपत्तीच्या जागा, अनुकूल प्रदेश, भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमांसाठी अनुकूल पर्यावरण याविषयी माहिती गोळा करण्यात आली. १५ सप्टेंबर २०१० रोजी बरोबर एकावर्षाची एलआरओचे मिशन पूर्ण झाले. एलआरओमध्ये हाय रेसोल्युशनचा कॅमेरा बसवलेला आहे. ४० वर्षापूर्वीच्या अपोलो मिशनमधील चंद्रावरील मानवी पाऊल खूणा आपल्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद केल्या आहेत. नासाच्या ऑर्बिटरने चीनच्या चँग ३ आणि चँग ४ लँडरचे तसेच काही महिन्यांपूर्वी चंद्रावर क्रॅश लँडिंग केलेल्या इस्रायलच्या बेरेशीटचे सुद्धा फोटो काढले आहेत.